राकेश शर्मा ते शुभांशु शुक्ला: भारतीय अंतराळ विज्ञानाची झेप

Shubhanshu-Shukla-Becomes-634th-Astronaut-To-Reach-Space

‘भारत एक दिवस चंद्रावर पोहोचेल’ हे स्वप्न कधी काळी केवळ कल्पनेत होते. पण आज भारत फक्त चंद्रावर पोहोचलेला नाही तर तिथे सहजपणे आत्मविश्वासाने उतरलेला आहे. ही कहाणी आहे भारताच्या अंतराळ प्रवासाची! राकेश शर्मा यांच्यासारख्या साहसी अंतराळवीरांपासून ते इस्रोच्या शेकडो वैज्ञानिकांपर्यंत आणि अलीकडेच अंतराळात जाऊन पृथ्वीवर परत आलेल्या शुभांशु शुक्ला यांच्यासारख्या नव्या पिढीच्या शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचलेली ही यशोगाथा एकाच वेळी वैज्ञानिक प्रगतीची आणि राष्ट्रीय आत्मसन्मानाची साक्ष आहे.

१९८४ मध्ये राकेश शर्मा हे रशियाच्या मदतीने ‘सोयूझ टी-११’ या अंतराळयानातून अवकाशात झेपावले आणि ते अंतराळात गेलेले पहिले भारतीय ठरले. “भारत कसा दिसतो वरून?” या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रश्नावर त्यांनी दिलेले उत्तर “सारे जहां से अच्छा” आजही लोकांच्या स्मरणात घर करून आहे. हे उत्तर केवळ काव्यात्मक नव्हते तर त्यामागे भारताचा अंतराळावरील पहिल्या ठसा उमटवण्याचा अभिमान होता.

article-l-2023823520261473574000

राकेश शर्मांच्या उड्डाणानंतर खूप काळ भारताने मानवी अंतराळ प्रवासात फारशी पावले टाकली नाहीत. मात्र इस्रोने उपग्रह प्रक्षेपण, दूरसंचार, हवामान निरीक्षण, आणि शैक्षणिक प्रसार या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले. आर्यभट्ट, इन्सॅट, एज्युसॅट, भास्कर अशा उपग्रह मालिकांनी भारताला आपल्या गरजांसाठी उपयुक्त अशा स्वदेशी अवकाश व्यवस्थेची पायाभरणी करून दिली.

मात्र खरी झेप घेतली ती २००८ साली! इस्रोने ‘चांद्रयान-१’ ही चंद्र मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली आणि चंद्रावर पाणी आहे याची पुष्टी केली. हा क्षण विज्ञानाच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची ओळख घडवणारा ठरला. यानंतर २०१३ मध्ये ‘मार्स ऑर्बिटर मिशन’ (मंगलयान) अवघ्या एका प्रयत्नात, अल्प खर्चात, यशस्वीरीत्या मंगळाच्या कक्षेत पोहोचले. केवळ ४५० कोटी रुपये खर्च करून भारताने मंगळाच्या कक्षेत यान पोहोचवले. ही कामगिरी तर जगाच्या दृष्टीने चमत्कारच होती. “मंगलयान” पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचलेले जगातील पहिले यान होते. जगभरात भारताच्या नियोजनशक्ती, अभियांत्रिकेतील कौशल्य आणि वैज्ञानिक बांधिलकीची प्रशंसा झाली. 

भारताचा अंतराळ विज्ञानाचा प्रवास केवळ तांत्रिक प्रगतीपुरता मर्यादित नाही तर त्याने सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील योगदान दिले आणि देत आहे. ‘जीसॅट’ आणि ‘इनसॅट’ मालिका शैक्षणिक, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरल्या. ‘भुवन’ या भारताच्या स्वतःच्या उपग्रह चित्रमापन प्रणालीने गुगल अर्थला पर्याय दिला. ‘नाविक’ प्रणालीने भारताला स्वतंत्र जीपीएस दिला. इस्रोने उपग्रह कार्यक्रमात फक्त दूरसंचार, हवामान वा शिक्षण यापुरतेच मर्यादित न राहता, मूलभूत वैज्ञानिक संशोधनाच्या दिशेनेही पावले उचलली. याच दृष्टीने २१ सप्टेंबर २०१५ रोजी प्रक्षिप्त करण्यात आलेला अ‍ॅस्ट्रोसॅट हा भारताचा पहिला अंतराळ वेधशाळा उपग्रह होता.

अ‍ॅस्ट्रोसॅट उपग्रहाचे उद्दिष्ट होते विविध तरंगलांबींवर अंतराळातील तारकांचे, आकाशगंगांचे आणि उच्च-ऊर्जा घटना यांचे निरीक्षण करणे. अतिनील ते क्ष-किरणापर्यंतच्या श्रेणींमध्ये निरीक्षण करणाऱ्या उपकरणांनी सुसज्ज असा हा उपग्रह आहे. यामुळे भारतीय खगोलशास्त्रज्ञांना कृष्णविवरे, न्यूट्रॉन तारे, दीर्घिकांचे महासमूह यांचा अधिक सखोल अभ्यास करता आला. भारत अशा प्रकारचा उपग्रह विकसित करणारा पाचवा देश ठरला.

दुसरीकडे, पृथ्वीवरील समुद्र विज्ञान आणि हवामान अभ्यासासाठी इस्रोने ओशनसॅट मालिकेची निर्मिती केली. ओशनसॅट-१ (१९९९), ओशनसॅट-२ (२००९) आणि ओशनसॅट-३ (२०२२) हे उपग्रह भारताच्या समुद्र किनाऱ्यांवरील शेती, मासेमारी, चक्रीवादळ निरीक्षण आणि समुद्री पर्यावरण व्यवस्थापनासाठी वापरले जातात.

या साऱ्या उपग्रह प्रकल्पांमुळे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचा केवळ वैज्ञानिक प्रगतीपुरता उपयोग झाला नाही तर राष्ट्रीय विकासाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा कार्यक्रम म्हणून त्याचा उपयोग झाला. भारतातील हवामान अंदाज अधिक अचूक होऊ लागले, नैसर्गिक आपत्तींच्या आधीच सूचना मिळू लागल्या, शेतीसाठी पीक नमुने, मातीची माहिती, नद्यांचे वहन हे सगळे डेटा रूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू लागले.

या साऱ्यामुळे अंतराळ विज्ञान हे सामान्य भारतीयाच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेले. आजही आपण टीव्हीवरील थेट प्रक्षेपण, जीपीएस, मोबाईल संवाद, हवामानाचा अंदाज किंवा अगदी अन्नधान्य धोरणे ठरवताना वापरले जाणारे उपग्रह डेटा ही या सर्वामध्ये आर्यभट्टपासून सुरू झालेल्या त्या यंत्रणेचीच व्याप्ती आहे.

आज परिस्थिती अशी आहे की भारत केवळ आपलेच नव्हे तर इतर देशांचे उपग्रहही कमी खर्चात अवकाशात पोहोचवतो. २०१७ मध्ये भारताने एका मोहिमेमध्ये १०४ उपग्रह एकत्र प्रक्षेपित करून जागतिक विक्रम केला. यामुळे भारत हा ‘स्पेस लाँच मार्केट’मध्ये एक विश्वासार्ह, स्वस्त आणि अचूक देश म्हणून ओळखला जातो.

या सर्व पार्श्वभूमीवर २०२३ साल हे भारताच्या अंतराळ विज्ञानासाठी निर्णायक ठरले. ‘चांद्रयान-३’ मोहिमेने यशस्वीरीत्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा ऐतिहासिक पराक्रम केला. चंद्राचा हा भाग पूर्वी कधीही कोणत्याही देशाने स्पर्श केलेला नव्हता. २३ ऑगस्ट २०२३ रोजी हे लँडिंग झाले आणि चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा चौथा देश ठरला. ही कामगिरी महत्त्वपूर्ण आहे कारण दक्षिण ध्रुवावर पाण्याचा बर्फ असल्याचे मानले जाते, जे भविष्यातील चंद्राच्या शोधासाठी एक मौल्यवान संसाधन आहे. चंद्राच्या अंधाऱ्या, उंचसखल प्रदेशांमध्ये यान उतरवणे एक अत्यंत अवघड काम होते. पण ‘विक्रम लँडर’ आणि ‘प्रज्ञान रोव्हर’ने हे कार्य अत्यंत अचूकतेने केले. या मोहिमेत अनेक तरुण भारतीय अभियंते, प्रकल्प प्रमुख आणि वैज्ञानिकांची एक संपूर्ण नवी पिढी सक्रिय होती. त्यात एक महत्त्वाचे नाव म्हणजे शुभांशु शुक्ला!

त्यांनी चांद्रयान-३ मोहिमेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. शुभांशु शुक्ला यांनी ‘लँडर इम्पॅक्ट डायनॅमिक्स’ आणि ‘लँडिंग स्टेबिलिटी’ संबंधित विश्लेषणांवर काम करताना चंद्राच्या कठीण भूभागावर यान सुरक्षित उतरण्यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक उपाय शोधून काढले. अत्यंत कमी वेळेत, कमी संसाधनांमध्ये आणि अपार दबावाखाली त्यांनी दाखवलेली वैज्ञानिक समज, चिकाटी आणि धैर्य ही आजच्या भारतीय अंतराळ कार्यक्रमाची खरी ओळख ठरते. 

२०२५ मध्ये एक ऐतिहासिक पाऊल उचलत शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय ठरले. अ‍ॅक्सिओम स्पेसच्या ‘अ‍ॅक्स-४’ या खासगी अंतराळ मोहिमेचा तो भाग होता. ही मोहीम २६ जून रोजी स्थानकावर पोहोचली होती. अ‍ॅक्स-४ मोहिमेदरम्यान शुक्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे ६० वैज्ञानिक प्रयोग केले, त्यापैकी सात प्रयोग हे इस्रोच्या संकल्पनेतील होते. इस्रोने २०२७ मध्ये गगनयान मोहीम, २०३५ मध्ये भारतीय अंतराळ स्थानक आणि २०४० मध्ये चंद्रावर मानव पाठवण्याचे उद्दिष्ट जाहीर केले असून शुभांशु शुक्ला यांचे हे योगदान त्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

‘गगनयान’ ही भारताची स्वदेशी मानवी अंतराळ उड्डाण योजना आहे. या मोहिमेसाठी विशेष जीएसएलव्ही एमके-III रॉकेट तयार करण्यात आले आहे. अनेक सुरक्षा चाचण्या, बचाव मोड्युल, प्रशिक्षण केंद्रे आणि शारीरिक प्रशिक्षण सुरू झाले आहे. हे भारतासाठी नव्या अंतराळ युगाचे दार उघडणारे पाऊल आहे. भारत आपला स्वतःचा अंतराळवीर अंतराळात पाठवण्याच्या मार्गावर आहे, पूर्णपणे स्वदेशी यंत्रणेसह! यातून भारत अंतराळ क्षेत्रात अमेरिकन ‘नासा’, रशियन ‘रॉसकॉसमॉस’, युरोपीय ‘ईएसए’, आणि चिनी ‘सीएनएसए’ या महत्त्वाच्या संस्थांच्या रांगेत उभा राहू पाहतो. इन-स्पेस आणि न्यूस्पेस इंडिया लिमिटेड या नव्या धोरणात्मक संस्था खासगी भागीदारी आणि व्यावसायिक संधी वाढवण्यासाठी तयार करण्यात आल्या आहेत. ‘अंतरिक्षातलं स्टार्टअप युग’ आता भारतात सुरू झालं आहे. 

आदित्य एल१ मोहिमेने सूर्याच्या निरीक्षणात भारताला स्थान मिळवून दिले आहे. यामध्ये सूर्याच्या लॅग्रेंज बिंदूवर यान पाठवले असून तेथून सूर्याचे सतत निरीक्षण केले जात आहे. यामुळे सौर वादळे, सौर चुंबकीय क्षेत्र यांचा अभ्यास करून पृथ्वीवरील संप्रेषण व्यवस्थांवर होणारा परिणाम कमी करता येईल. तसेच भविष्यात चांद्रयान-४ आणि मंगळयान-२ मोहिमा, चंद्रावर प्रयोगशाळा, स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणे ही सर्व उद्दिष्टे आहेत.

यात केवळ शास्त्रज्ञच नव्हे तर अभियंते, संगणक तज्ज्ञ, विश्लेषक, व्यवस्थापक, प्रसार संस्था, अगदी ज्या शाळांमध्ये या वैज्ञानिकांची पहिली कल्पना रुजली त्या शिक्षकांपर्यंत अनेकांचे योगदान आहे. भारताच्या अंतराळ विज्ञानाची कहाणी ही केवळ रॉकेट्सची नाही, ती मानवी जिद्द, ज्ञानाचा सन्मान आणि नव्याला सामोरे जाण्याच्या मानसिकतेची आहे.

आज अंतराळ हा केवळ विज्ञानाचा विषय राहिलेला नाही. तो संरक्षण, हवामान, दळणवळण, शेती, अर्थव्यवस्था आणि शिक्षण यांना स्पर्श करणारा एक बहुआयामी विषय बनला आहे. भारताची स्वतःचे अंतराळ स्थानक उभारण्याची, चंद्रावर दीर्घकालीन संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारण्याची आणि अगदी मंगळावर मानवी वसाहतीचा विचार करण्याची दृष्टी आता दृष्टिपथात आहे.

Shubhanshu-Shukla-Becomes-634th-Astronaut-To-Reach-Space

राकेश शर्मा यांनी भारताला अंतराळाच्या पायर्‍यांवर चढायला लावले. शुभांशु शुक्ला यांनी त्यावर स्वदेशी झेंडा लावायचे काम केले आहे. ही झेप केवळ विज्ञानाच्या क्षेत्रातली नसून ती आत्मनिर्भर भारताची, आत्मविश्वासी भारताची आणि ज्ञानकेंद्रित समाजाची आहे.

सुजाता बाबर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *